ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतक-यांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या कारवाईच्या विरोधात प्रसिद्ध वकील व स्वराज अभियानाचे नेते प्रशांत भूषण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
स्वराज अभियानादरम्यान योगेंद्र यादव जंतरमंतर येथे समर्थकांसह आंदोलन करत असताना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी त्यांना व आंदोलकांना ताब्यात घेतले. या कारवाईचा यादव यांनी निषेध केला. आपल्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचे सांगत मारहाणीची छायाचित्रेही ट्विटरवर प्रसिद्ध केली. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेध करत प्रशांत भूषण यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. 'आमच्याकडे आंदोलनासाठी परवानगी होती आणि शांततापूर्ण मार्गानेच आमचे आंदोलन सुरू होते. मात्र आंदोलनासाठी परवागी नसल्याचे पोलिसांनी सांगितले असता यादव यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता व कोणतेही कारण न देता यादव व इतर आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत', असे भूषण यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर 'नांगर मोर्चा' काढण्याची यादव यांची योजना होती , मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत यादव यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून शेतकरी येणार होते.