मथुरा : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटविण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मथुरा येथील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे याचिकादाराचे वकील हरिशंकर जैन यांनी सांगितले. ही याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने रंजना अग्निहोत्री व अन्य सात जणांनी केली असल्याचे जैन यांनी न्यायालयाला सांगितले होते. ते म्हणाले की, मथुरा येथील न्यायालयाकडून आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहोत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया शर्मा यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी ही याचिका दाखल करून घेण्यास न्यायाधीशांनी नकार देत ती फेटाळून लावली. हा आदेश देताना न्यायालयाने प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, १९९१ या कायद्याचा आधार घेतला. रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद टोकाला गेला होता. त्यावेळी हा कायदा संसदेने संमत केला. १५ आॅगस्ट १९४७ दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यादिवशी देशातील प्रार्थनास्थळांची जी स्थिती असेल ती तशीच ठेवावी, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.