ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि बनावट नोटांचं रॅकेट नेस्तनाबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाला उत्तर प्रदेशातील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिलं आहे, असं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. "500 आणि 1000 रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून रद्द करण्याच्या निर्णयाचा सरकारनं पुनर्विचार करून तो मागे घ्यावा. लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैसे खर्च करण्याची संधी दिली जावी.", अशी मागणी याचिकाकर्त्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे."500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने त्या नोटा रुग्णालयात स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे त्याचा रुग्णांच्या उपचारावर परिणाम होतो आहे. सरकारने लोकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या नोटा बंद केल्या, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.", असेही याचिकाकर्त्या वकिलाने याचिकेत म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील वकिलाची 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. मात्र त्या याचिकेवर सुनावणी करायची की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.
500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
By admin | Published: November 09, 2016 6:19 PM