ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ८ - किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांनी ही याचिका केली आहे. एसबीआयने याचिकेत विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची तसंच त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 7 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास संमती दर्शवली आहे. विजय मल्ल्या देश सोडून गेल्यास त्यांना पुन्हा पकडणं कठीण होईल असं अॅटर्नी जनरल यांनी न्यायालयात सांगितले आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी युकेमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने मल्ल्यांविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून कर्ज म्हणून घेण्यात आलेला पैसा विदेशामध्ये धाडण्यात आला का या अंगाने सक्तवसुली संचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे.