ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21- पेट्रोल पंपावर लागणा-या लांब रांगा टाळण्याच्या हेतूने तेल मंत्रालयाने पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी करता येईल का यादृष्टीने विचार सुरु केला आहे. तेल मंत्रालयाने यासंबंधी ट्विट करत प्री-बूकिंग केल्यास ग्राहकांना तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी पर्यायांचा विचार सुरु असल्याचं सांगितलं आहे. दररोज किमान 350 कोटी लोक पेट्रोल पंपांवर जात असतात. पेट्रोल पंपावर वर्षभरात किमान 2 हजार 500 कोटींची उलाढाल होत असते.
"ग्राहकांनी प्री-बूकिंग केल्यास तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासासंबंधी पर्यायांचा विचार सुरु आहे. यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होईल, सोबतच पंपांवर लांगणा-या लांब रांगाही टाळता येतील", असं ट्विट तेल मंत्रालयाने केलं आहे.
“Options being explored where petro products may be door delivered to consumers on pre booking” @dpradhanbjp (1/2)— Petroleum Ministry (@PetroleumMin) April 21, 2017
“This would help consumers avoid spending excessive time and long queues at fuel stations” @dpradhanbjp (2/2)— Petroleum Ministry (@PetroleumMin) April 21, 2017
तेलासाठी भारत मोठी बाजारपेठ असून जगात तिस-या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. आयओसी, भारत पेट्रोलियम लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांच्या मालकीचे जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. येत्या 1 मे पासून निवडक पाच शहरात नियमित पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होतील. आंध्रप्रदेशातील पुदूच्चेरी, विझाग, राजस्थानमधील उदयपूर, झारखंडमध्ये जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरात प्रायोगिक तत्वावर दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतला जाईल.
सध्या तेल कंपन्या दरमहिन्यात 1 आणि 16 तारखेला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतात. जून 2010 मध्ये सरकारने पेट्रोलच्या किंमती नियंत्रण मुक्त केल्या आणि किंमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला. ऑक्टोबर 2014 पासून डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना मिळाला.