नवी दिल्ली : बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ११ व्या दिवशीही वाढ झाली. पेट्रोल ५५ पैशांनी, तर डिझेल ६० पैशांनी महागले. या ११ दिवसांत पेट्रोल ६.०२ रुपयांनी, तर डिझेल ६.४ रुपयांनी महाग झाले आहे.सरकारी तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, बुधवारच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ७७.२८ रुपये लिटर झाले आहे. दरवाढीपूर्वी ते ७६.७३ रुपये लिटर होते. डिझेल ७५.१९ रुपये लिटरवरून ७५.७९ रुपये लिटर झाले आहे.ही दरवाढ संपूर्ण देशात लागू असून, विक्रीकर आणि व्हॅटमुळे प्रत्येक राज्यातील इंधन दरात काही प्रमाणात तफावत आहे. कोविड-१९ साथीमुळे तेल कंपन्यांनी सलग ८२ दिवस इंधन दराचा दैनंदिन फेरआढावा बंद केला होता.७ जून रोजी तो पुन्हा सुरू करण्यात आला. तेव्हापासून सलग ११ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात एकरकमी वाढ केली होती. त्यानंतर मार्चच्या मध्यात तेल कंपन्यांनी दोन्ही इंधनांचे दर गोठविले होते. सरकारी तेल कंपन्या इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी वाढलेल्या उत्पादन शुल्काचा भार ग्राहकांवर न लादता घसरलेल्या कच्चा तेलाच्या किमतीत समायोजित केला होता.करवाढीमुळे दरकपात टळलीकेंद्र सरकारने करवाढ केली नसती, तर देशातील इंधन दरात कपात झाली असती. तथापि, करवाढीमुळे दरकपात टळली. त्यानंतर कंपन्यांनी दर गोठविण्याचा निर्णय घेतला.सलग ८२ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर कंपन्यांनी जैसे थे ठेवले. त्यानंतर ११ दिवसांपूर्वी पुन्हा दैनंदिन दर आढावा सुरू करण्यात आला. मागील ११ दिवसांत पेट्रोलच्या दरात ६.०२ रुपयांची, तर डिझेलच्या दरात ६.४ रुपयांची वाढ झाली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:35 PM