नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.
24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. कर्नाटक निवडणुकीच्या 19 दिवसांच्या काळात इंडियन ऑइल कंपनीनं इंधन दरवाढ रोखली होती. मात्र 12 मे रोजी मतदान झाल्यानंतर 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लीटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 21 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी लगेचच दुसरी वाढ करण्यात आली. मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलीटर 15 पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलीटर 23 पैशांनी वाढवण्यात आले होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन आठवडे असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर गेले तीन आठवडे इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत राहतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान होण्याच्या 19 दिवसांपासून या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. निवडणुकांचा प्रचार सुरू असताना लोकांवर ताण येऊ नये, म्हणून आम्ही दरवाढ करण्याचे टाळले आहे, असा न पटणारा खुलासा पेट्रोलियम सचिवांनी केला होता.
दर आणखी भडकणार
सूत्रांच्या माहितीनुसार, 25 एप्रिल ते 14 मे या काळात पेट्रोल आणि डिझेलची प्रतिबॅरल किंमत, तसंच वाहतूक खर्च यात अनुक्रमे 4.15 डॉलर व 3.94 डॉलर वाढ झाली आहे. हा वाढीव खर्च भरुन काढण्यासाठी कंपन्यांकडून इंधनाच्या दरात आणखी वाढ केली जाऊ शकते.