Punjab Crime : पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकत शिवसेनेच्या नेत्याच्या घरावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शिवसेना नेत्याची कार जळाली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. आरोपी बॉम्ब हल्ला करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाबमधील लुधियाना येथील शिवसेना नेते योगेश बक्षी यांच्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. सध्या हैबोवाल पोलीस ठाणे आणि जगतपुरी चौकीच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत. त्यांनी आग आटोक्यात आणल्याचे बक्षी यांनी सांगितले. आम्ही घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून आल्याचे समोर आल्याचे योगेश बक्षी यांनी म्हटलं.
"रस्त्यावरुन मोठा आवाज आल्याने योगेश बक्षी हे घराबाहेर आले आणि त्यांनी पाहिले की त्याची गाडी पेटली होती. योगेश बक्षी यांनी जमेल तसे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे दिसून आले. घरापासून काही अंतरावर आरोपींनी बाईक थांबवली होती. काही अंतरावरुन काचेच्या बाटलीला आग लावून पेट्रोल बॉम्ब बनवून त्यांनी घराच्या दिशेने फेकले. माझ्या कारवर काचेची बाटली पडली, त्यामुळे आग लागली," असे बक्षी यांनी म्हटलं. ३० जुलै रोजी मला धमकी आल्याचेही बक्षी यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी दिवसभरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. लवकरच आरोपी पकडले जातील आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.