चेन्नई - देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आजपासून 5 राज्यात निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच, चेन्नईतील भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बहल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने तामिळनाडू येथील बीजेपी कार्यालयावर मध्यरात्री 1 वाजता पेट्रोल बॉम्ब टाकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
भाजपा नेते कराटे त्यागराजन यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयावर जवळपास 1.30 वाजता पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. याअगोदर 15 वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. त्यामध्ये, डीएमकेचा हात होता. या घटनेबद्दल आम्ही तामिळनाडू सरकारचा निषेध करतो. याप्रकरणी आम्ही पोलिसांना माहिती दिली असून भाजपा कार्यकर्ते अशा घटनांमुळे घाबरणार नाहीत, असेही त्यागराजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत अडकलेल्या मच्छीमार आणि त्यांच्या बोटींना सोडविण्यासाठी श्रीलंकेसोबत संवाद साधण्याची विनंती केली होती. मात्र, मोदींनी त्यावर कुठलीही कृती केली नाही.