तामिळनाडूतील चेन्नई येथे बुधवारी (25 ऑक्टोबर) राजभवनाबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, याप्रकरणी गिंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. करुक्का विनोद असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करुक्का विनोद या व्यक्तीने तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याविरोधातही काही महिन्यांपूर्वी तमिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या नीट विरोधी विधेयकावर स्वाक्षरी न केल्याबद्दल घोषणाबाजी केली. पोलिसांनी सांगितले की, करुक्का विनोद हा सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील अण्णा युनिव्हर्सिटीकडून गिंडीत आला आणि त्याने राजभवनाच्या गेटबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकला.
रिपोर्टनुसार, जेव्हा तो राजभवनाच्या मुख्य गेटवर पोहोचला, तेव्हा त्याने पेट्रोल बॉम्ब काढला, तो पेटवला आणि एंट्री गेटवर फेकला. यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळ पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. यापूर्वी करुक्का विनोदने तेनाम्पेट पोलिस स्टेशन, कामराजर अरंगम आणि भाजप राज्य मुख्यालयाबाहेर क्रूड बॉम्ब फेकले होते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल बॉम्ब फेकण्यामागे आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे नीट विरोधी विधेयक?दरम्यान, तामिळनाडू विधानसभेने 13 सप्टेंबर 2021 रोजी एक विधेयक मंजूर केले होते, ज्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (NEET) परीक्षेतून सूट दिली जाईल. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण राज्यपाल एन रवी यांनी ते विधानसभेत परत पाठवले होते. यानंतर तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ते पुन्हा मंजूर केले, परंतु यावेळीही तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी ते पास करण्यास नकार दिला आहे. हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर करणार नसल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते.