नवी दिल्ली-देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीनं (Petrol Diesel Price) आसमान गाठलं आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, भोपाळ, बंगलोर, पाटणा, चंदीगड, लखनऊ, नोएडामध्ये १ लीटर पेट्रोलची किंमत शंभरी पार गेली आहे. मुंबई आणि भोपाळमध्ये तर डिझेलच्या किमतीनंही शंभरी गाठली आहे. केरळ आणि कर्नाटकमधील काही भागांमध्ये सोमवारी डिझेलचा दर शंभरचा आकडा गाठला. यातच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी मोठं विधान केलं आहे. इंधनाची दरवाढ म्हणजे एका पद्धतीनं देशात केल्या जणाऱ्या मोफत लसीकरणाची भरपाई आहे, असं रामेश्वर तेली यांनी म्हटलं आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी आसाममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामेश्वर तेली यांनी हे विधान केलं आहे. "इंधनाच्या किंमती काही वाढलेल्या नाहीत. पण त्यात करांचा समावेश आहे. त्यामुळे इंधन महागलं आहे. तुम्ही मोफत कोरोना विरोधी लस घेतली असेलच, मग यासाठीचा पैसा कुठून येणार? जनतेकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क लसीकरणासाठी घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे इंधनावरील कराच्या माध्यमातून ते गोळा केलं जात आहे", असं रामेश्वर तेली यांनी म्हटलं आहे.
सोमवारी नेमकी किती झाली दरवाढ?सोमवारी पेट्रोलच्या दरात ३० पैशांची तर डिझेलच्या दरात ३५ पैशांची दरवाढ नोंदविण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०४.४४ रुपये आणि डिझेलचा दर ९३.१७ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ११०.४१ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर १०१.०३ रुपये प्रतिलीटर इतका नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात ४ ऑक्टोबरचा दिवस वगळता इतर सर्वच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ नोंदविण्यात आली आहे. याच महिन्यात १० दिवसांत पेट्रोलच्या दरात २.८० रुपये तर डिझेलच्या दरात ३.३० रुपयांची वाढ झाली आहे.