दोन दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) किंमतीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. यावरुन आता काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांनी चार राज्यांतील विजयाची पहिली भेट दिल्याचं म्हटलं.
"जेव्हा भाजप सत्तेत येईल तेव्हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढतील असं मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच सांगितलं होतं. ४ राज्यांमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांना इंधन आणि गॅसच्या किंमतीत वाढ करून पहिली भेट दिली आहे" असं बघेल म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता. "गॅस, डिझेल आणि पेट्रोलवर लावलेला लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. आता सरकार सातत्यानं किंमतीचा विकास करेल. महागाईच्या महासाथीबद्दल पंतप्रधानांना विचारलं तर ते थाळ्या वाजवण्यास सांगतील," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.