मुंबई : तेल कंपन्यांकडून जुलैपासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ आॅक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात अचानक थांबवून आता कपात सुरूआहे. पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच तेल कंपन्यांनी दरकपात सुरू केली असल्याचे दिसत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरपासून पुन्हा दर भडकण्याची भीती आहे.इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले. रुपयासुद्धा डॉलरसमोर कमकुवत आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकावर गेले. केंद्र व राज्य सरकारांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही इंधनावरील करांमध्ये कपात केली. त्यानंतर, चारच दिवसांनी ६ आॅक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी १८ आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनदरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.सध्याची स्थिती सप्टेंबरसारखीचडॉलरचा दर व कच्च्या तेलाचे भाव या दोन्ही घटकांची स्थिती सध्या सप्टेंबरसारखीच आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण सेलच्या मते, सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाचा सरासरी दर ७७.५० डॉलर प्रति बॅरल (१५९ लीटर) होता. त्या महिन्यात एका डॉलरचा दर ७२.०२ रुपये होता. आता कच्चे तेल जेमतेम कमी होऊन ७६.५१ डॉलर प्रति बॅरल झाले आहे, पण डॉलर ७३.४२ रुपयांपर्यंत वधारला आहे.
निवडणुकांसाठीच पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीचे सत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:35 AM