लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात ५ ते १० रुपये कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनीही गुरुवारी मूल्यवर्धित कर (व्हॅट) २ ते ७ रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील वाहनचालक व शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मात्र व्हॅटसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.
व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोल व डिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे. केंद्राने इंधनाचे दर बुधवारी कमी केल्यानंतर गुरुवारी उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, पुडुच्चेरी यांनी व्हॅटमध्ये कपात जाहीर केली. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटकात ७ रुपये, तर उत्तराखंडमध्ये पेट्रोलवरील व्हॅट २ रुपयांनी कमी केला आहे. हरयाणात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त होईल. बिहारमध्ये तसेच ओडिशाने व्हॅटमध्ये ३ रुपयांची कपात केली आहे. नवे दर लागू केल्यानंतर सर्वच राज्यांत इंधनाचे दर १०० रुपये प्रतिलिटरहून कमी होतील.
अबकारी कर लागू केल्यानंतरच्या इंधनावर व्हॅट लावला जातो. त्यामुळे एरवीही व्हॅटमध्ये कपात झालीच आहे. पेट्रोल ५.७० ते ६.३५ रुपये तर डिझेल ११.१६ ते १२.८८ रुपयांनी स्वस्त होईल. शिवाय वरील राज्यांनी व्हॅट कमी केला आहे. केंद्राने अबकारी करात आणखी कपात करावी, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.
बिगरभाजपराज्यांचा निर्णय कधीहोणार?भाजपशासित राज्यांबरोबरच अन्य राज्येही व्हॅटमध्ये कपात करतील, असा अंदाज होता. पण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांनी गुरुवारी कपात केली नाही. केरळने व्हॅट कमी न करण्याचा निर्णय घेतला असून, पश्चिम बंगालने विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्हॅट २ रुपयांनी कमी केला हाेता.
महसूल घटणारइंधन स्वस्त केल्याने केंद्राच्या महसुलात दरमहा ८७०० काेटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. वर्षभरात हा आकडा १ लाख कोटींहून अधिक असेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केंद्राने करातून १.७१ लाख काेटी कमावले. व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर अनेक राज्यांचा महसूल दीड ते दोन हजार कोटी रुपयांनी घटेल.
गुजरात, सिक्किम, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, मणिपूर, पुडुच्चेरी, मिझोरम, गोवा यांनी व्हॅट ७ रुपयांनी कमी केला आहे. ओडिशा, बिहार यांनी ३ रुपयांची घट केली असून, मध्य प्रदेशने ४ व अरुणाचलने ५.५ टक्के कपात केली आहे. उत्तराखंडने २ रुपये कपात केली असून, हरयाणा व उत्तर प्रदेशात पेट्रोल व डिझेल १२ रुपयांनी स्वस्त होईल.