नवी दिल्ली – देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. अनेक शहरात पेट्रोल ११० रुपये प्रतिलीटर विक्री होत आहे. अनेक राज्यात डिझेलच्या किंमती १०० रुपयापर्यंत पोहचल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारविरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरोधात देशभरा मोर्चे काढले. मोदी सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे.
इंधन दरवाढीवरून वाद सुरू असताना विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या केंद्र सरकारने म्हटलंय की, मागील एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नाही. ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना राज्यसभेत सांगितले आहे.
एप्रिल २०२० पासून आतापर्यंत पेट्रोलच्या किंमती ३२ रुपये प्रतिलीटर दराने वाढल्या आहेत. पुरी यांनी म्हटलं की, मागील १ वर्ष पेट्रोल आणि डिझेलवर केंद्रीय करात कोणतीही वाढ केली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव तसेच विविध राज्याकडून आकारण्यात येणारे कर त्यामुळे इंधन दरवाढ होत असल्याचं कारण दिलं आहे. सरकार कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दराबद्दल जागतिक व्यासपीठावर प्रश्न उपस्थित करत आहे.
दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे २६ जून २०१० आणि १९ ऑक्टोबर २०१४ बाजार निर्धारित बनवण्यात आलं आहे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात तेल उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार पेट्रोल, डिझेलच्या किंमत ठरवण्याचा निर्णय घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तेल उत्पादक आणि वितरण कंपन्या आंतरराष्ट्रीय मूल्याच्या आधारे रुपये आणि डॉलरचा विचार करून दरात वाढ करत असतात असंही पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.
इंधन दरवाढीचा फटका
पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटरचे भाव सातत्याने बदलतात. २०१८ मध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० ते ८० रुपयांच्या घरात होते. ते आता शंभरीपार केले आहे. यातून वाहतुकीचा खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्याने वाढले आहेत. ६० रुपये किलो दराने मिळणारा भाजीपाला आता १०० ते १२० रुपयांच्या घरात गेला आहे. खाद्यतेल प्रति किलो ९० ते ९५ रुपयांना मिळत होते. आता ते १५० रुपयांच्या घरात आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दरही वाढले आहेत. शेती आणि घर खर्चावर होणाऱ्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीचा फटका प्रवासी वाहतुकीलाही बसला आहे. खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढविले आहेत.