नवी दिल्ली - पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. मात्र, प्रशासन ही दरवाढ सर्वस्वी तेल कंपन्यांकडून होत असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत शनिवारी (8 सप्टेंबर) पेट्रोल 38 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 47 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.77 तर डिझेलचा प्रति लिटर दर 76.98 झाला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 44 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एका लिटरमागे 80.38 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 72.51 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत; प्रति लीटर ८९ रुपये
सलग 15 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.