नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे अन्नधान्य, भाज्यांचे दर वधारले आहेत. मात्र लवकरच यापासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या ८ दिवसांत खनिज तेलाच्या दरात घट झाली आहे. खनिज तेलाचे दर ७७.६० डॉलर प्रति बॅरलवरून ६८.४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. गेल्या १० महिन्यांत पहिल्यांदाच खनिज तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लवकरच इंधन कंपन्या लवकरच पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करू शकतात. दैनिक जागरणनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
गेल्या आठ दिवसांत खनिज तेलाच्या दरात बॅरलमागे ८.२० डॉलरची घट झाली आहे. बॅरल आणि पेट्रोल, डिझेलचा सध्याचा दर पाहता सर्वसामान्यांना चार ते पाच रुपयांचा दिलासा मिळेल. पेट्रोलचा दर लीटरमागे ४, तर डिझेलमागे ५ रुपयांनी स्वस्त होईल. इंधनाच्या दरात कपात झाल्यास मोदी सरकारला काहीसा दिलासा मिळू शकेल. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये इंधन दरवाढीचा विषय गाजताना दिसत आहे. केंद्रानं पेट्रोलियम दरांवरील करांतून ३.३५ लाख कोटी रुपये वसूल केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला होता.
कोरोना काळात जनता आर्थिक अडचणीत आली असताना सरकार इंधनावरील करांच्या माध्यमातून जनतेची लूट करत असल्याचा आरोप विरोधकांनकडून सुरू आहे. तर कोरोना संकटामुळे उद्योगधंद्यांच्या माध्यमातून येणारा कररूपी महसूल कमी झाल्यानं इंधनावरील कर कमी करता येत नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारातच खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे इंधन कंपन्यांना सर्वसामान्यांना दिलासा देता येईल. याशिवाय सरकारला मिळणाऱ्या महसूलालादेखील फटका बसणार नाही. पेट्रोल, डिझेलवर लावण्यात आलेल्या करातून केंद्र आणि राज्य सरकारला मोठं उत्पन्न मिळतं. पेट्रोल, डिझेलच्या दरातील तब्बल ६० टक्के वाटा करांचा आहे. इंधनाचे दर कमी केल्यास वाहतूक खर्च कमी होईल. त्यामुळे वस्तूंचे दर खाली येतील आणि महागाई नियंत्रणात येऊ शकेल.