नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच आज चौथ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत 12 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलच्या दराने दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर 12 पैशांनी वाढले असून ते 84.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर 13 पैशांनी वाढले असून आता ग्राहकांना प्रति लिटर डिझेलसाठी 72.66 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका हा देशाला बसला असून मागच्या दोन महिन्यात सोमवारचे पेट्रोलचे ( 6 ऑगस्ट) दर हे सर्वाधिक आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 76.97 रुपये आणि 68.44 रुपये आहेत. दिल्लीत सोमवारी महाग दराने पेट्रोल विकलं जात आहे. याआधी 9 जून रोजी पेट्रोलची किंमत ही अधिक होती. कोलकातामध्ये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अनुक्रमे 79.89 रुपये आणि 71.22 रुपये आहेत. तर चेन्नईमध्ये 79.96 रुपये पेट्रोल तर 72.29 रुपये डिझेलचा दर आहे.