नवी दिल्ली - सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परस्परांशी स्पर्धा करू लागल्या आहेत. पेट्रोलने शंभरी कधीच पार केली आहे. तर काही ठिकाणी नव्वदीत असलेले डिझेलही शतक झळकावण्याच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे. पुढील वर्षापर्यंत कच्चे तेल 100 डॉलर प्रतिबॅरेल एवढे महाग असेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याच दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.
इंधन दरवाढीचा (Petrol Diesel Prices) पुन्हा एकदा भडका उडाला आहे. अशातच "पेट्रोल-डिझेल 100 पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस (Congress ) जबाबदार" असल्याचं म्हणत धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. "काँग्रेसने 2014 पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे 80 टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते" असं देखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
18 महिन्यांपर्यंत खनिज तेलाचे दर चढत्या भाजणीचे राहणार आहेत. तेलाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असे व्यस्त प्रमाण असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, असा अंदाज आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 63 डॉलपर्यंत स्थिरावतील असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, सद्य:स्थितीत 75 डॉलर प्रतिबॅरेल अशी किंमत आहे. ही किंमत आगामी काळात वाढत जाईल. आपल्या एकूण गरजपैकी 82 टक्के इंधन भारत आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होतो. त्यामुळे प्राप्त स्थिती पाहता नजीकच्या काळात तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न होता उलटपक्षी आणखी वाढतील, असा अंदाज आहे. 2022 च्या अखेरपर्यंत ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 100 डॉलर प्रतिबॅरेल एवढी होण्याची शक्यता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीही भडकतील.
धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं होतं. प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना "मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर 35 हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या MSP ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत" असं म्हटलं होतं.