लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती २६.४२ टक्क्यांनी कमी होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांपासून तेल कंपन्यांनी सहा वेळा तेलाच्या किमतीत वाढ केली आहे. सोमवारीही पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैसे प्रति लिटर महाग करण्यात आले असून, एका आठवड्यात किमतीत ४ रुपयांनी वाढ झाली आहे.
दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ११५ रुपये, तर ९८.५० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १३७ दिवस स्थिर ठेवल्यानंतर २२ मार्चपासून इंधन दरात वाढ करण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर १४० डॉलरवरून आता १०० डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. मात्र, तरीही कंपन्यांकडून दरवाढ करण्यात येत आहे. कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ९ ते १२ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.