नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज वाढविण्याचा सपाटा रविवारी सलग आठव्या दिवशीही सुरू ठेवला.ताज्या वाढीने पेट्रोल दर लिटरमागे ६२ पैशांनी, तर डिझेल ६४ पैशांनी अधिक महाग झाले.सुमारे ८२ दिवसांनंतर कंपन्यांनी गेल्या रविवारपासून पुन्हा इंधनाचे दर रोज बदलणे सुरू केले. गेल्या आठ दिवसांत केलेल्या वाढीमुळे पेट्रोलचा दर लिटरमागे ४.५२ रुपयांनी, तर डिझेलचा दर ४.६४ रुपयांनी वाढला आहे. तेल कंपन्यांनी देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार दररोज बदलण्याची पद्धत जून २०१७ मध्ये सुरू केल्यापासून रविवारी केलेली दरवाढ ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ आहे.जगातील अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ हळूहळू उठवून अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू झाल्यावर मागणीही वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. एप्रिलच्या तुलनेत त्या दुप्पट होऊन बॅरलला ४० डॉलरच्या असपास पोहोचल्या आहेत. देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असल्याने आणखी काही दिवस दरवाढ होऊ शकेल, असे तेल कंपन्यांमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
सलग आठव्या दिवशीही पेट्रोल, डिझेलची दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 6:42 AM