मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाब, गुजरातसह काही राज्यांमध्ये मागणीप्रमाणे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जात नाहीय, यामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. पंपांना पुरवठा करण्यास पेट्रोलिअम कंपन्यांनी हात आखडते घेतले आहेत. यामुळे देशभरात आता तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलिअम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे. गेल्या चार आठवड्यांपासून इंधनाच्या दरात काहीही बदल झालेला नाहीय. यामुळे कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे. महाराष्ट्रातही औरंगाबादमधील पेट्रोल पंपांच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी असाच आरोप केला होता. याचा परिणाम आता देशभरात होताना दिसत आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील गेल्या दोन तीन दिवसांपासून पन्नास टक्केच पुरवठा होत आहे. राजस्थानमध्ये देखील पेट्रोल-डिझेल टंचाई सुरु झाली आहे.
युपीच्या हरदोईमध्ये तर त्यापेक्षा धक्कादायक बाब घडली आहे. रविवारी रात्रीपासून लोकांमध्ये पेट्रोल संपणार असल्याची माहिती पसरू लागली आणि गर्दी होऊ लागली. किंमत वाढणार असल्याच्या अफवांमध्ये रिलायन्सने आपल्या पेट्रोलचे दर ५ रुपयांनी आणि डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढविल्याचे एनबीटी, अमर उजालाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सध्या शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपले आहे.
बिहारमध्ये सप्लाय अद्याप प्रभावित झालेला नाही. हरियाणा, म. प्रदेश आणि पंजाबमध्ये एचपी आणि भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल पंपांवर टंचाई होऊ लागली आहे. तर इंडियन ऑईलच्या पंपांवर पुरवठा सुरळीत असला तरी देखील त्यांच्यावर दबाव वाढला आहे. आठवड्याभरात इथेही टंचाई सुरु होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलिअम कंपन्यांना किती नुकसान?कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. यामुळे पेट्रोलिअम कंपन्यांना डिझेलमागे २३ आणि पेट्रोलमागे १६ रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे पुरवठा कमी केला जात आहे. मध्य प्रदेश पंप असोशिएशननुसार पंप मालकांना कंपन्यांनी केवळ आठ तासच पेट्रोल पंप सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.