भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:58 PM2022-04-04T16:58:56+5:302022-04-04T16:59:41+5:30
सध्या भारताला आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करावं लागते.
नवी दिल्ली - देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. १४ दिवसांत पेट्रोलच्या दरात ८.४० रुपयांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्वस्त पेट्रोलची अपेक्षा करणे कठीण आहे. पण केंद्र सरकार अशी यंत्रणा बनवणार आहे, ज्यामुळे आगामी काळात पेट्रोल स्वस्त मिळू शकेल. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे की, देशाला सवलतीत इंधन हवे आहे. रशियाच्या ऑफरनंतरच भारताने स्वस्त तेलाची खरेदी सुरू केली असून भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहणार आहे. याचा अर्थ आगामी काळात स्वस्त तेलासह कंपन्यांचे मार्जिनही सुधारेल. सरकार उत्पादन शुल्कातही सवलत देऊ शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या भारताला आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करावे लागते.
'सवलत असेल तर तेल का खरेदी करू नये?'
रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही रशियाकडून तेलाची खरेदी सुरू केली असून किमान ३ ते ४ दिवसांसाठी तेल खरेदी केले आहे. 'मी माझी ऊर्जा सुरक्षा आणि माझ्या देशाचे हित प्रथम स्थानावर ठेवेन. जर पुरवठा सवलतीत उपलब्ध असेल तर मी तो का घेऊ नये?' युरोपने एक महिन्यापूर्वी रशियाकडून १५% अधिक तेल आणि वायू खरेदी केला आहे. मग आम्ही खरेदी का करू नये? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
ब्रिटन परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत वक्तव्य
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताकडून स्वस्त रशियन तेल खरेदी केल्याचं समर्थन करण्यात आले. नुकतेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की मला वाटते की, देशांनी बाजारात जाऊन त्यांच्या लोकांसाठी कोणते चांगले सौदे आहेत हे पाहणे स्वाभाविक आहे. "जर आम्ही दोन किंवा तीन महिने थांबलो आणि खरोखरच रशियन गॅस आणि तेलाचे मोठे खरेदीदार कोण आहेत हे पाहिले तर मला शंका आहे की यादी पूर्वीपेक्षा फार वेगळी नसेल," असंही त्यांनी सांगितले. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री एलिझाबेथ ट्रस यांच्या उपस्थितीत परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. जयशंकर यांना उत्तर देताना ट्रस म्हणाल्या की, रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा ब्रिटन आदर करतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे आणि मी भारताला काय करावे हे सांगणार नाही असं त्यांनी म्हटलं.