सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परस्परांशी स्पर्धा करू लागल्या आहेत. पेट्रोलने शंभरी कधीच पार केली आहे. तर नव्वदीत असलेले डिझेलही शतक झळकावण्याच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्य्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे. पुढील वर्षापर्यंत कच्चे तेल १०० डॉलर प्रतिबॅरेल एवढे महाग असेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता तर नाहीच, उलट त्या आणखी वाढणार आहेत.
पुरवठ्यावर १८ महिन्यांपर्यंत परिणाम
१८ महिन्यांपर्यंत खनिज तेलाचे दर चढत्या भाजणीचे राहणार आहेत. तेलाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असे व्यस्त प्रमाण असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, असा अंदाज आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ६३ डॉलपर्यंत स्थिरावतील असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, सद्य:स्थितीत ७५ डॉलर प्रतिबॅरेल अशी किंमत आहे. ही किंमत आगामी काळात वाढत जाईल.
भारतातील इंधन दरांवर परिणाम
आपल्या एकूण गरजपैकी ८२ टक्के इंधन भारत आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होतो. त्यामुळे प्राप्त स्थिती पाहता नजीकच्या काळात तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न होता उलटपक्षी आणखी वाढतील, असा अंदाज आहे.
- ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती यंदा तसेच पुढच्या वर्षी सातत्याने वाढत राहणार.
- कोरोनोत्तर काळात जागतिक अर्थव्यवस्था जोमाने धावू लागणार असल्याने तेलाच्या मागणीत वाढ होणार.
- २०२२च्या अखेरपर्यंत ब्रेंट क्रूड तेलाची किंमत १०० डॉलर प्रतिबॅरेल एवढी होण्याची शक्यता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीही भडकतील.