नवी दिल्लीः कर्नाटक निवडणुकीनंतर सुरू झालेलं पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र आज तेराव्या दिवशीही कायम राहिलंय आणि मोदी सरकार चौथ्या वाढदिवशी काहीतरी खूशखबर देईल, अशी आशा बाळगून बसलेल्या जनतेची निराशाच झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज १३ पैशांची, तर डिझेलमध्ये १६ पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ८५.७८ रुपये झाला आहे, तर डिझेल ७३.३९ रुपयांवर पोहोचलंय.
वाढता वाढता वाढतच चाललेल्या इंधनाच्या दरांमुळे जनतेच्या रागाचाही भडका उडण्याचा धसका घेऊन गेल्या दोन-चार दिवसांत केंद्रातील मोदी सरकारनं वेगानंच पावलं उचलल्याचं चित्र दिसत होतं. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. त्यातच, शुक्रवारी रशियानं खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चं तेल काहीसं स्वस्त झालं होतं. त्यामुळे आज - मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीदिनी आपल्याला 'काडीचा आधार' मिळू शकेल, असं सामान्यांना वाटत होतं. परंतु, तसं काही झालेलं नाही.
असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर -
१५ मे - ८२.७९ रुपये१६ मे - ८२.९४ रुपये१७ मे - ८३.१६ रुपये१८ मे - ८३.४५ रुपये१९ मे - ८३.७५ रुपये२० मे - ८४.०७ रुपये२१ मे - ८४.४० रुपये२२ मे - ८४.७० रुपये२३ मे - ८४.९९ रुपये२४ मे - ८५.२९ रुपये२५ मे - ८५.६५ रुपये२६ मे - ८५.७८ रुपये