नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीनं त्रस्त झालेल्या जनतेला अखेर दिलासा मिळाल्याचं चित्र बुधवारी सकाळी पाहायला मिळालं. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये 59 पैशांनी घट झाल्याच्या बातम्या आल्या. पण ही सर्व माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरात 59 पैशांनी नाही, तर फक्त 1 पैशांनी घट झाल्याचं स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून देण्यात आलं आहे. 'पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. ती आता दुरूस्त करण्यात आली आहे. आजच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरात काही मोठा बदल झालेला नाही. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 59 पैशांनी घट तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी घट झाली नसून फक्त एक पैशांनी घट झाली आहे तसंच डिझेलच्या दरात दिल्लीत 56 पैशांनी व मुंबईत 59 पैशांनी घट झाली नसून ती घटही फक्त 1 पैशांनी झाली आहे', असं स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. जवळपास तीन आठवडे इंधनाचे दर वाढलेले नव्हते. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच इंधन दराचा भडका उडाला. त्यानंतर सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत राहिल्यानं त्याची मोठी झळ सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागली.