मुंबई - पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने प्रति लिटरसाठी नव्वदचा आकडा पार केला आहे. तर मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 89.54 रुपये आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 78.42 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल, अशी चर्चा रंगत आहे. मात्र, पेट्रोल शंभरी पार करणार नसल्याचे समजते.
देशातील वाढत्या महागाईला सामोरे कसे जायचे, असा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. त्यातच, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे कंबरडे मोडले असून पेट्रोल शंभरी पार करते की काय, अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. तर यावरुन मेम्स आणि जोक्सही व्हायरल होत आहेत. पूर्वी सचिनच्या शतकाची प्रतीक्षा लागायची, आता पेट्रोलच्या शतकाची प्रतीक्षा लागलीय, असे जोक्स व्हायरल होत आहेत. मात्र, काही केल्यास पेट्रोलचा दर शंभर रुपये होणार नाही, अशी माहिती आहे. कारण, पेट्रोल पंपावरील पेट्रोल देणाऱ्या मशिनवर शंभर आकडाच दिसणार नाही. प्रतिलिटर 100 रुपये अशी सेटिंग्ज सध्यातरी पेट्रोलच्या मशिनवर नसल्याचे एका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने सांगितले आहे. सध्या दररोज पेट्रोलचे दर कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे मशिनमध्ये सेटींग्ज करण्यात आले आहे. मात्र, या डिस्प्लेवर प्रति लिटर 100 रुपये अशी सेटिंग्ज उपलब्ध नसल्याचेही या कर्मचाऱ्याने म्हटले. त्यामुळे सध्यातरी पेट्रोल शंभरी पार करणार नाही, असे म्हणता येईल.
हिंदुस्थान पेटोलियम कार्पोरेशन लिमिटेडकडून सध्या 99 ऑक्टेन पेट्रोलची विक्री केली जाते. पॉवर 99 या नावाने हे पेट्रोल विकण्यात येते. या पेट्रोलची किंमत सर्वसाधारण पेट्रोलपेक्षा या प्रिमियम पेट्रोलची किंमत 20 रुपयांनी जास्त आहे. मात्र, डिस्प्ले मशिनवर प्रति लिटर जास्तीत जास्त 99.99 रुपयांपर्यंतच किंमत दर्शवली जाते. त्यामुळे सध्यातरी पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये 100.00 असा प्रतिलिटर आकडा दिसत नाही. त्यासाठी पेट्रोल पंपचालकांना या सेटींग्जमध्ये बदल करण्यासाठी विशेष इंजिनिअर्संना बोलवावे लागणार आहे.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मागील 73 दिवसांत 43 वेळा इंधन दरात वाढ केली. 6 जुलै ते 17 सप्टेंबर दरम्यान पेट्रोल 6.31 व डिझेल 6.59 रुपये प्रति लिटरने महागले. फक्त आठ वेळा दरांमध्ये किंचित घसरण झाली. इंधनाचे दर भडकत असल्याने सामान्यांची होरपळ सुरूच आहे. डिझेलवर धावणारे ट्रक, टेम्पो, बसेस यांचे भाडे वाढल्याने दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्य महागले आहे. दुचाकी वापरणाऱ्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे.