मुंबई - तुमच्याकडे काहीतरी करण्याची धडपड असल्यास पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवणं अवघड नाही. अनेकदा स्पर्धा परीक्षांच्या निकालातून आपण हे पाहिलंय. रिक्षावाल्याच्या मुलानं युपीएससी क्रॅक केली, बँडवाल्याचा लेक साहेब झाला, या बातम्या युथ इंडियाला प्रेरणा देतात. तर, युपीएससीत मुलींची बाजी हा मथळही मुलींच्या कर्तृत्वाची पताका फडकवत असतो. आता, उत्तर प्रदेशातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या बापाच्या लेकीने अशीच यशाची पताका फडकावली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी या मुलीच्या कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. तर, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनीही या मुलीच्या यशाच कौतुक करत ट्विटरवरुन बापलेकीचा फोटो शेअर केला आहे. आर्या राजगोपल असं या मुलीचे नाव असून तिचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. आर्याने आता कानपूरच्या आयआयटीमध्ये पेट्रोलियम इंजिनिअरच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे, सध्या ही बाप-लेकीची जोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनीही ट्विट करुन म्हटले की, काळजाल भिडणारी घटना आहे, आर्या राजगोपाल हिने तिच्या वडिलांना आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आम्हा सर्वांनाच सन्मानित केलं आहे. वडिल-मुलीची ही जोडी देशासाठी प्रेरणादायी असून रोल मॉडेल आहे. माझ्या शुभेच्छा... असे भावनिक ट्विट पुरी यांनी केले आहे.
आर्या राजगोपाल हिचे वडिल गेल्या 20 वर्षांपासून पेट्रोल पंपावर काम करत आहेत. वडिलांचा त्याग आणि स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आर्याने स्वत:ला सिद्ध करून आदर्श निर्माण केला आहे. आयआयटी कानपूर येथे आर्या पेट्रोलियम इंजिनिअरींगचे पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. यापूर्वी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून तिने पदवी प्राप्त केली आहे.