ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - देशभर पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे. पेट्रोल पंप चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे म्हणत पेट्रोलपंपमालकांनी 16 जूनपासून संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून 16 जूनपासून पेट्रेल व डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहून आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल इंधनाच्या किमतीचा आढावा दर दोन आठवड्यांंनी घेतात. पाँडेचरी, चंदिगढ, जमशेदपूर, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे पेट्रोलच्या किमती रोजच्या रोज बदलण्याचा १ मेपासून करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तो देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सद्यस्थितीला भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर 95 टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात. यामुळे तेल कंपन्यांचे नुकसानाचे प्रमाण कमी होईल असा दावा केला गेला होता.