मुंबई - घराघरात पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री लवकरच सुरू करू शकू, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करताच त्यांच्यावर नेटिझन्स तुटुन पडले आहेत. असे काही प्रत्यक्षात झालंच कर सर्वत्र आग लागण्याच्या घटना घडतील, अशी भीती बहुतेकांनी व्यक्त केली असून बहुतांश लोकांनी प्रधान यांची खिल्ली उडवली आहे.
ट्विटरवर प्रधान यांच्या निर्णयाचा समाचार घेताना अनेक लोकांनी हे सगळं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरावरुन लक्ष उडवण्यासाठी केलं जात असल्याचा सूर लावला आहे. 'असले निर्णय घेण्याआधी इंधनाचे दर निम्म्यावर आणा' अशी सूचना प्रधान यांना करण्यात आली आहे. " हा कसला निर्णय आहे , यामागे कोणता तर्क लावला आहे ? हा निर्णय घेण्याचा सल्ला कोणी दिला, असा सल्ला देणा-याला तात्काळ निलंबित करा" असे रीट्वीट प्रधान यांना उत्तरादाखल करण्याच येत आहे. घरोघरी पेट्रोल विकायचं आहे ? पण तुम्ही फायरप्रुफ घरं बनवलीत का असा प्रश्नही त्यांना विचारला जात आहे, काही लोकांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीमध्ये आणण्याचा सल्ला दिला आहे.
पेट्रोल डिझेलची ऑनलाइन विक्री केली तर काळा बाजार होऊ शकतो
प्रधान यांच्या ट्विटवर काही लोकांनी पेट्रोल पंप आता बंद करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का?, असं विचारुन यामुळे सगळीकडे आग लागण्याच्या घटना घडतील तर पेट्रोल बॉम्बही फुटताना दिसतील, अशी भीती व्यक्त केली आहे. गंमत म्हणून काही लोकांनी मी टूजी इंटरनेटवरुन पेट्रोल डाऊनलोड करू शकतो का?, असेही धर्मेंद्र प्रधान यांना विचारले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भीती व्यक्त होत असतानाच यामुळे साठेबाजी करणा-यांना अच्छे दिन येतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. पेट्रोल किंवा डिझेल साठवून त्याचा पुन्हा दरावर परिणाम घडवून आणायची नवी वाट सरकार साठेबाजांना मिळवून देत असल्याचा आरोप सरकारवर होत आहे.