नवी दिल्ली - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी जीएसटी आणि नोटांबदीचं समर्थन करत म्हटले की, ''नवीन चपलादेखील तीन दिवस चावतात, मग त्या व्यवस्थित होऊन जातात''. मध्य प्रदेशच्या एक दिवसाच्या दौ-यावर असताना धर्मेंद्र प्रधान यांनी हे विधान केले आहे. यावेळी इंदौर येथे प्रसिद्धी माध्यामांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, ''लोकांना त्रास झाला. मात्र जीएसटी असो किंवा नोटाबंदी, यामुळे रोजगारावर परिणाम झाल्याची जी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे, ती योग्य नाही. तुम्ही जेव्हा नवीन चप्पल वापरता तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस त्याही चावतात, पण चौथ्या दिवशी त्या अगदी व्यवस्थित होऊन जातात''.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटी म्हणदे 'गब्बर सिंग टॅक्स' असं म्हणत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत प्रधान म्हणाले की, ''मी देवाकडे प्रार्थना करेन की त्यांना सद्बुद्धी द्यावी, सत्तेत असताना त्यांनी जीएसटी अंमलात आणण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यांच्या पक्षाला श्रेय दिलं जात नसल्यानं त्यांना समस्या आहे. मात्र आम्ही तर त्यांना श्रेय दिलेलं आहे''
मोदीजी, जय शहाबद्दल एक वाक्य तरी बोला - राहुल गांधी ‘मोदीजी, ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे तुम्ही म्हणाला होता. जय शहाने भरपूर खाल्ले, आता त्याबद्दल एक वाक्य तरी बोला, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गांधीनगरमधील सभेत पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर हल्ला बोल केला. या वर्षाअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गुजरातमध्ये राजकीय रण पेटले आहे. अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या ओबीसी तसेच पटेल समाजाच्या नेत्यांनीही काँग्रेसला साथ देण्याचे ठरवल्यामुळे निवडणूक रंगणार आहे.
गुजराती आवाज विकत घेऊ शकत नाहीतुम्ही गुजरातचा आवाज विकत घेऊ शकत नाही. तुम्ही गुजराती माणसाला विकत घेऊ शकणार नाही. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या नेत्यांनी ब्रिटिश महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा. मागील २२ वर्षांपासून गुजरातमध्ये जनतेचे नव्हे, तर पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार आहे. गुजरातच्या जनतेला रोजगार, चांगले शिक्षणहवे आहे. पण भाजपा सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे.
आंदोलकांना विकत घेण्यासाठी भाजपाचे ५00 कोटी : आंदोलन करणा-यांना विकत घेण्यासाठी भाजपाने ५00 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे, असा आरोप पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या तुमच्या योजना अपयशी ठरल्या, पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली, असा टोमणाही त्यांनी मोदी यांना मारला.