नवी दिल्ली: पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल परवा जाहीर होतील. कालच उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. या कालावधीत इंधनाचे दर स्थिर होते. युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संभाव्य इंधन दरवाढीवर भाष्य केलं आहे.
इंधन दरवाढीच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आलं असता, तेल कंपन्या लवकरच याबद्दल निर्णय घेतील. जनहित लक्षात घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं पुरी यांनी सांगितलं. संभाव्य इंधन दरवाढीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. 'पटापट पेट्रोलची टाकी भरून घ्या. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपत आलीय,' असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.
राहुल गांधींच्या टीकेला पुरी यांनी प्रत्युत्तर दिलं. 'पेट्रोल, डिझेल केवळ निवडणुकीपुरतं स्वस्त आहे. त्यामुळे वाहनातील इंधनाच्या टाक्या भरून घ्या, असं एक तरुण नेता लोकांना वारंवार सांगत आहे. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी पेट्रोलियम पदार्थांचे दर नियंत्रणमुक्त केले होते. आम्ही तर गेल्या नोव्हेंबरमध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं,' असं पुरी म्हणाले.