नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावामुळे सगळीकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. राजकीय पक्षांनी तर रस्त्यावर उतरून पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या भावावरून आंदोलन केलं आहे. आता लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असं काही होऊ शकतं याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पण आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये धर्मेद्र प्रधान बोलत होते.
पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करुन देण्याची संकल्पना धर्मेंद्र प्रधान यांनी सगळ्यात आधी संसदेच्या सल्लागार समिती सदस्यांसमोर मांडली होती. २१ एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये संसदेच्या सल्लागार समितीची बैठक झाली. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि पेट्रोल पंपांवरील लांब रांगा टाळण्यासाठी ही संकल्पना पेट्रोलियम मंत्रालयाकडून मांडण्यात आली होती.
‘संपूर्ण देशातील पेट्रोलियम क्षेत्राची एकूण उलाढाल ६.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. देशातील हजारो पेट्रोल पंपांवर दररोज येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही कोटी आहे. दररोज पेट्रोल पंपांवर येणाऱ्या ग्राहकांना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्यदेखील अपेक्षित आहे,’ असं प्रधान यांनी म्हटलं आहे.