ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पीएफ खातेदारांसाठी खूशखबर आहे. निवृत्तीवेतन संस्था असलेल्या ईपीएफओच्या सदस्यांना आता 50 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी कम लाइफ बेनिफिट मिळणार आहे. ज्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ आपल्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये योगदान दिले आहे, अशा अशा सदस्यांना हा लाभ मिळणार आहे. मात्र कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी लॉयल्टी लाइफ बेनिफिटसाठी 20 वर्षांच्या योगदानाची अट शिथिलक्षम असेल.
ईपीएफओची सर्वोच्च निर्णायक संस्था असलेल्या मध्यवर्ती विश्वस्त मंडळाने (सीबीटी) काल झालेल्या बैठकीत कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याला एकरकमी अडीच लाख रुपये देण्याची शिफारस केली आहे. याबाबत माहिती देताना एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "सीबीटी ईडीएलआय अंतर्गत किमान 2.5 लाख रुपये देण्याची आणि लॉयल्टी कम लाइफ बेनिफिट देण्याची शिफारस केली आहे. आता सरकाने ही शिफासर लागू केल्यावर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळू लागेल. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर दोन वर्षांसाठी लागू करण्यात येईल, त्यानंतर तिच्या यशापयशाचा आढावा घेण्यात येईल," 20 वर्षांहून अधिक काळापासून पीएफमध्ये योगदान देणाऱ्या आणि वयाच्या 58 ते 60 व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. मात्र अपंगांसाठी ही अट नसेल.
या तरतुदीनुसार ज्यांचे मूळ वेतन 5 हजार रुपये आहे, अशांना 30 हजार, 5001 ते 1000 रुपये मूळ वेतन असलेल्यांना 40 हजार आणि 10 हजारहून अधिक मूळ वेतन असलेल्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट मिळणार आहे. ईडीएलआयमध्ये 18 हजार 119 कोटी रुपये एवढी विक्रमी रक्कम जमा झाल्याने त्याचा लाभ सदस्यांना मिळवू देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.