नवी दिल्ली : भारतात प्रथमच आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा (बी.1.617.2) संसर्ग झालेल्या लोकांची रुग्णालयात दाखल होण्याची संख्या गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये आढळलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत दुप्पट आहे. दरम्यान, फायझर-बायोएनटेक आणि अॅस्ट्रॉजेनेकाची कोरोनाविरोधी लस ही डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण प्रदान करते, असे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी स्कॉटलंडमध्ये केलेल्या सविस्तर अभ्यासातून असे आढळले की, फायझर-बायोएनटेक लस शरीरात कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी चांगले प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करते.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे २१ जूननंतर ब्रिटन सरकार सर्व लॉकडाउन निर्बंध आणखी चार आठवडे वाढविण्याचा विचार करत आहे, अशावेळी द लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात डेल्टा व्हेरिएंटबाबत निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य स्कॉटलंडचे (Public Health Scotland) कोव्हिड-19 प्रकरणांचे संचालक जिम मॅकमॅनामीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आपण सर्वांनी पुढे येऊन लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे'. तसेच, लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
एडिनबर्ग आणि स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीज तसेच सार्वजनिक आरोग्य स्कॉटलंडच्या संशोधकांना असे आढळले की, फायझर लस कोरोनाव्हायरसच्या अल्फा व्हेरियंट विरूद्ध 92 % तर दुसर्या डोसच्या 14 दिवसानंतर डेल्टा व्हेरिएंटविरोधात 79% संरक्षण प्रदान करते. या तुलनेत अॅस्ट्रॉजेनेका लस डेल्टा व्हेरिएंटविरोधात केवळ 73% आणि 60% संरक्षण प्रदान करते. मात्र, आकडेवारीच्या निरीक्षणाच्या स्वरूपामुळे या दोन लसींची तुलना सावधगिरीने केली जावी, असा अभ्यास संशोधकांनी केला.
विशेष म्हणजे, 11 जून रोजी ब्रिटनच्या आरोग्य तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले होते की, भारतात सापडलेला पहिला कोविड -19 चा डेल्टा व्हेरिएंट किंवा चिंताजनक व्हेरिएंट (व्हीओसी) बी 1.617.2 ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत जवळपास 60 टक्के अधिक संक्रमक आहे आणि काही प्रमाणात लसींची प्रभावशीलता कमी करते.
पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) आपल्या ताज्या विश्लेषणामध्ये म्हटले आहे की, 'पीएचईच्या नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. सर्व विभागांमध्ये डेल्टा प्रकरणांचा वाढीचा दर जास्त आहे. स्थानिक अंदाजानुसार त्यांची संख्या 4.5 ते 11.5 दिवसांच्या दरम्यान दुप्पट आहे.