मुंबई, दि. 31- एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा एखादी नवी वस्तू खरेदी केल्यावर त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणं हा आजचा नवा नियम आहे. दररोज घडणाऱ्या गोष्टी स्टेटस किंवा फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. जर तुम्ही तुमचा नवा अलीशान बंगला, नवी गाडी, पर्यटन स्थळाचं मोठं कॉटेज याचे फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असाल, तर तुम्हाला आता सावध रहायला हवं. पण आता सोशल मीडियावर फोटो शेअर करायची हीच क्रेझ तुम्हाला अडचणीतही आणू शकते. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.
बँक आणि पॅन कार्ड आधार कार्डशी जोडल्यानंतर आता आयकर विभागाचे अधिकारी सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच आयकर विभागाकडून सोशल मीडियावर नजर ठेवण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. बँकेतील व्यवहारांसोबतच सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या फोटोंवर इन्कम टॅक्सची करडी नजर असेल. आयकर विभागाने सात वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करुन ‘प्रॉजेक्ट इन्साइट’ राबवला आहे. तसंच जगातील सर्वात मोठा बायोमेट्रीक डाटाबेस तयार करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीच्या विकासासाठी एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडची मदत घेण्यात आली आहे.
‘प्रॉजेक्ट इन्साइट’वर अर्थमंत्रालयातून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडसह गेल्या वर्षी करार झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
आयकर विभागाकडून फेसबुक तसंच इन्स्टाग्रावर युजर्सने घेतलेले नवे दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवर एका टीमच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. जर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ बसला नाही तर त्यांची चौकशी केली जाईल.
या नव्या नियमामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही. प्रत्येकाच्या मागे चौकशीचा तगादा लागणार नाही, असं आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर करडी नजर ठेवली तर घरात छापा न टाकताच आम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असंही मत अधिकाऱ्यांने व्यक्त केलं आहे. क्रेडिट कार्डने होणारा खर्च, जागा आणि शेअर बाजारातील गुंतवणूक, कॅश ट्रॅन्झॅक्शन आणि सेविंग्ज याची माहिती नवीन प्रणालीत अपलोड केली जाईल. हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजेच मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.