ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - दिल्ली आयआयटी कॅम्पसमध्ये मंगळवारी (30 मे) पीएचडी करणा-या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीचा मृतदेह ती राहत असलेल्या खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मंजुला देवक असे मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती विवाहित होती. मंजुला 27 वर्षाची होती व ती मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रहिवासी होती. मंगळवारी जवळपास संध्याकाळी 8 वाजण्याच्या मंजुलानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणी तपासकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये राहणारी 27 वर्षीय मंजुला देवक ""पाण्याचे स्त्रोत"" या विषयावर पीएचडी करत होती. नालंदा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 413 मध्ये ती राहत होती. तिच्या शेजारी राहणा-यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना संपर्क साधला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुलाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र, घटनास्थळी कोणतेही चिठ्ठी आढळून आलेली नाही. या घटनेबाबत मंजुलाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी मंजुलाचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जाणार आहे. मंजुलाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून अहवाल येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
मार्च महिन्यात दिल्ली आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेलच्या छतावरुन उडी मारुन एका विद्यार्थ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहेत. मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले होते.