हैदराबाद: खासदार, मंत्र्यांना पाहताच सलाम ठोकणारे पोलीस कायम दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एक खासदार पोलीस अधिकाऱ्यांना सलाम करताना दिसत आहे. बहुतांश खासदार पोलिसांनी सलाम केल्यास तो अपमान समजत असताना हा खासदार पोलिसांना इतक्या आनंदानं सलाम का करतोय, असा प्रश्न हा फोटो पाहून अनेकांना पडला. या फोटोमागील कहाणी अतिशय रंजक आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे सर्कल इन्स्पेक्टर गोरंतला माधव यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढवली. हिंदूपूरमधून त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला. तेलुगू देसम पक्षाच्या क्रिस्ताप्पा निम्मला या विद्यमान खासदाराचा त्यांनी 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला. यानंतर माधव यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बशा यांच्याशी भेट झाली. सेवेत असताना बशा हे माधव यांना वरिष्ठ होते. त्यामुळेच बशा समोर येताच माधव यांनी त्यांना सलाम केला. तर बशा यांनीही खासदार झालेल्या माधव यांना सलाम ठोकला. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माधव यांचा पोलीस अधिकाऱ्याला सलाम करतानाचा फोटो व्हायरल होताच अनेकांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडीयावर याबद्दल बरीच चर्चादेखील झाली. त्यावर माधव यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मला माझे जुने वरिष्ठ अधिकारी मतमोजणी केंद्रावर दिसले. त्यांना मी सलाम केला आणि मग त्यांनी मला सलाम केला. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याच भावनेतून आम्ही एकमेकांना सलाम केला,' अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
पोलीस निरीक्षक झाला खासदार; जुन्या सहकाऱ्यांना पाहताच ठोकला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:20 PM