श्रीनगर : ‘बेटी बचाओ’च्या पोस्टरवर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती आणि अन्य महत्त्वाच्या महिलांसोबत फुटीरवादी नेत्या आशिया अंद्राबी यांचा फोटो छापल्यानंतर काश्मीरमध्ये खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे बाल विकास प्रकल्प अधिकाºयाला निलंबित करण्यात आले. महेबुबा मुफ्ती सरकारमधील भाजपाचे नेतेही या प्रकारामुळे संतप्त झाले आहेत.मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या कार्यक्रमात हे पोस्टर लावण्यात आले. या फोटोत मदर तेरेसा, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, गायिका लता मंगेशकर आणि पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांचा समावेश आहे. सोबत फुटीरवादी नेत्या आशिया अंद्राबी यांचा फोटो छापण्यात आला आहे.अनंतनागचे उपायुक्त मोहम्मद युनुस मलिक यांनी सांगितले की, बाल विकास अधिकारी शमिमा यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेच्या चौकशीचे आदेशदेण्यात आले आहेत. जन सुरक्षा कायद्यांतर्गत सध्या पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्या अंद्राबी यांच्यावर पाकिस्तानचा झेंडा फडकाविण्यासारख्या प्रकरणात प्रकरणे दखल आहेत. (वृत्तसंस्था)
‘बेटी बचाव’च्या पोस्टरवर फुटीरवादी महिलेचा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:40 AM