नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सेंट्रल व्हिस्टा या नवीन संसद भवनचे उद्घाटन झाले असून देशभरात या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे अनेक विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार सोहळ्याला उपस्थित नव्हते. मात्र, भाजप नेते आणि खासदार मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्ती करणारं हे सदन असल्याचं आपल्या भाषणात म्हटले. यावेळी, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित होते. तर, उपस्थित सर्वच खासदार नव्या संसद भवनात बसल्याचं पाहायला मिळालं. खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही नव्या संसद भवनातील फोटो शेअर केला आहे.
नव्या संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो व्हायरल झाले. त्यानंतर, अमित शहांसमवतेच खासदार स्मृती इराणींचा फोटोही व्हायरल झाला आहे. स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला असून फोटो बॉम्ब अंस कॅप्शनही दिलंय.
या फोटोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि स्मृती इराणी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. अमित शहांसमवेत नवीन संसद भवनातील पहिल्या काही रांगेत आणि अमित शहांसमवेत असल्याने स्मृती इराणींनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच, ''फोटो बॉम्ब.. - जेव्हा प्रत्येकजण मेन फ्रेमचा हिस्सा बनू इच्छितो'', असे कॅप्शन इराणी यांनी या फोटोला दिलंय. या फोटोत स्मृती इराणींच्या पाठिमागे केंद्रीयमंत्री किनश रेड्डी हेही दिसून येतात.
नवीन संसदेतील लोकसभा सभागृहात पहिल्या रांगेत गृहमंत्री अमित शहा दिसत आहेत. त्यांच्या पाठिमागे दुसऱ्या रांगेत स्मृती इराणी स्माईल देत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झालंय. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर काहींनी मिम्सही बनवले आहेत.