नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा काळाबाजार होत आहे. यामुळे केंद्र आणि हरियाणा सरकारने काही मद्य कंपन्यांना हॅन्ड सॅनिटायझर बनविण्याचा परवाना दिला आहे. मात्र तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीवर हरियाणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.
हरियाणात बनविण्यात आलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीवर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा फोटो छापण्यात आला. त्यानंतर हरियाणात राजकारण तापले. काँग्रेसनेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर कडाडून टीका केली. मात्र हे सॅनिटायझर मोफत कंपन्यांकडून वाटण्यात येणार की, यासाठी सरकारी फंडातून पैसे देण्यात येणार हे स्पष्ट झाले नाही.
कोरोना महामारी म्हणजे निवडणुकीचा प्रचार असा समज भाजपचा झाला आहे. या महामारीच्या आडून गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याची टीका दीपेंद्र हुड्डा यांनी केली. तसेच सॅनिटायझरनंतर मास्कवर भाजपनेत्यांना चिटकवणार का, असा सवाल हुड्डा यांनी केला.
हुड्डा यांच्या व्यतिरिक्त सुरेजवाला यांनी कडाडून टीका केली. ही वेळ राजकारण करण्याची नाही. कोरोना व्हायरस थैमान घालत असताना तुम्हाला भंपक राजकारण आणि स्वयंभू प्रचार करण्याशिवाय काही दिसत नाही का, असा सवाल सुरजेवाला यांनी केला. कृपया ही चूक सुधारावी. अन्यथा लोकांचा राजकारणावरील विश्वास उडेल, असंही ते म्हणाले.