मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातल्या बहुतांश भागांमधील वातावरण पेटलं आहे. ईशान्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलनं करत आहेत. त्याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे ईशान्य भारतात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एकीकडे ईशान्य भारतामधील स्थिती बिघडली असताना दुसरीकडे मुंबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत भव्य मोर्चा, हजारो नागरिक आंदोलनात सहभागी अशा मजकूरासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण मुंबईपर्यंत पसरल्याचा संदेश यातून पोहोचवला जात आहे. यामध्ये एका पुलाखाली हजारोंची गर्दी दिसत आहे. मात्र हा फोटो मुंबईतील नसल्याचं पडताळणीतून दिसून आलं. महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत हजारो उतरले रस्त्यावर?; जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:43 PM