चेन्नई, दि. 14 - 64वर्षीय महिलेच्या रेशन कार्डवर अभिनेत्री काजल अग्रवालचा फोटो आढळून आल्यामुळे तमिळनाडू सरकारवर सोशल मीडियातून टीका होत आहे. तमिळनाडू सरकारने रेशन कार्डऐवजी स्मार्ट कार्ड सुरू केले आहेत, मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ समोर येत आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात, एका ज्येष्ठ महिलेच्या स्मार्ट कार्डवर अभिनेत्री काजल अग्रवालचे छायाचित्र आढळून आले आहे. सोशल मीडियावर या स्मार्ट कार्डचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
सेलम जिल्ह्यातील कमलापुरम येथे राहणाऱ्या या 64 वर्षांच्या महिलेसोबत हा प्रकार घडला असून सरोजा असे या महिलेचे नाव आहे. सरोजाच्या स्मार्ट कार्डवर तिच्याऐवजी अभिनेत्री काजल अग्रवालचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र आणि सरोजा यांचा कोणताही संबंध नाही. आमच्या शेजारील एका महिलेच्या कार्डवरील छायाचित्रही तिच्यासारखे दिसत नाही. आता आम्हाला रेशन कसे मिळणार, असा प्रश्न सरोजाच्या नातेवाईकांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.
या गावातील अनेकांनी त्यांच्या स्मार्ट कार्डवर अनेक चुका असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या चुकांचा दोष सरकारचा आहे आणि अभिनेते, झाडे इत्यादींची छायाचित्रे असलेली स्मार्ट कार्डे देण्यात येत आहेत, असे पट्टाली मक्कळ काट्चि या पक्षाचे नेते रामदोस यांनी म्हटले आहे.