नवसारी : पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी नवसारी येथील न्यायालयाने वंसदा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. पटेल यांनी ९९ रूपये न भरल्यास त्यांना ७ दिवस तुरुंगात जावे लागू शकते. १२ मे २०१७ रोजी पटेल यांच्यावर नवसारी कृषी विद्यापीठात झालेल्या आंदोलनादरम्यान कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र फाडल्याचा आरोप होता.
न्यायमूर्ती व्ही. ए. धधल यांनी आमदार पटेल यांना कुलगुरूंच्या दालनात घुसून कामात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले. पटेल यांच्या व्यतिरिक्त इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या भरतीसाठी गैर-वनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना घेण्यास विरोध केला होता. यावेळी कुलगुरूंच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून अधिकाऱ्याला धमकावले आणि पंतप्रधान मोदींचा फोटो फाडण्यात आला होता.
आमदाराचा हेतू चांगला होता, अन्यथा...
न्यायालयाने म्हटले की, या गुन्ह्यात ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड आहे; पण आमदार विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याच्या चांगल्या हेतूने विद्यापीठात गेले होते. मात्र, त्यांची पद्धत योग्य नव्हती, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. दंड ठोठावल्यानंतरच सोडून देणे योग्य ठरेल, जेणेकरून भविष्यात लोक अशा मानसिकतेपासून दूर राहतील.