ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २३ - पोलिसांची एक घोडचूक एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी किती तापदायक ठरु शकते याचा अनुभव श्रीनगरमधील एका दुकानदाराला येत आहे. पोलिसांनी शहरातील गल्लीबोळ्यात लावलेल्या दहशतवाद्याच्या पोस्टरवर त्या दुकानदाराचा फोटो छापल्याने दुकानदाराची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे माझा जीव धोक्यात आला आहे असे या दुकानदाराने म्हटले आहे.
श्रीनगरमधील बोमहामा परिसरात इरफान शाह यांचे एक दुकान असून काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पोलिसांनी शहरातील चौकाचौकात वाँटेड दहशतवाद्यांची पोस्टर्स लावली होती. हे पोस्टर बघून इरफान यांना धक्काच बसला. सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यातील फरार दहशतवादी अब्दुल कयूम या दहशतवाद्याच्या नावाखाली चक्क इरफान शाह यांचा फोटो लावला होते. हा प्रकार बघून शाह चक्रावून गेले.
पोलिसांच्या पोस्टरवरील फोटो हा मी गेल्या वर्षी बारामुला येथील गार्डनमध्ये माझ्या चुलत भावासोबत काढला होता असा दावा इरफान यांनी केला आहे. पोलिसांनी लावलेल्या पोस्टरमध्ये हा फोटो कापून लावण्यात आला असून पोस्टरमधील फोटोमध्येही माझ्या बाजूला बसलेल्या भावाचा हाताचा हात दिसतो याकडे इरफान यांनी लक्ष वेधतात. या पोस्टरमधील दहशतवादी पकडून देणा-यांना १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असेही पोलिसानी म्हटले आहे. त्यामुळे शाह यांच्या अडचणीत आणखी भर पडली. याप्रकरणी शाह यांनी जम्मू काश्मीरच्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी संपर्क साधला. अब्दुल कयूम व इरफान शाह हे हुबेहुब दिसत असल्याने हा गोंधळ झाल्याचे पोलिसांनी शाह यांना सांगितले आहे. तसेच शाह यांनी मला एक प्रमाणपत्रही दिल्याचे इरफान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.