संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, महुआ मोईत्रा आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोबाबत आता शशी थरूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याची टीका थरूर यांनी केली आहे.
थरूर यांनी दावा केला की, हे फोटो एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये काढण्यात आले होते.मात्र हे फोटो कुठल्या तरी सिक्रेट मिटींगचे असल्यासारखे सादर केले गेले. महुआ मोईत्रा ह्या माझ्यापेक्षा वयाने १० ते २० वर्षांनी लहान आहेत. तसेच मी त्यांना माझ्या मुलीसारख्या मानतो, असे थरूर यांनी सांगितले.थरूर पुढे म्हणाले की, वाढदिवसाच्या पार्टीला १५ जण उपस्थित होते. माझ्या बहिणीलाही निमंत्रण दिलं होतं आणि ती सुद्धा इथे उपस्थित होती. मात्र काही लोकांनी जाणूनूबुजून फोटोमधून इतरांना हटवलं आणि हा कुठल्यातरी गोपनीय मिटिंगचा फोटो असल्यासारखे भासवले. हा कुठल्या तरी सिक्रेट मिटिंगचा फोटो आहे, असे ज्यांना वाटत आहे त्यांनी हा फोटो कुणी काढला असेल, याचा विचार करावा.
यावेळी ऑनलाइन ट्रोलर्सवर टीका करताना शशी थरूर म्हणाले की, मी ट्रोल्सना फारसं महत्त्व देत नाही. माझं प्राधान्य लोकांची कामं करण्याला आहे. याआधी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही भाजपाच्या ट्रोलसेनेवर त्यांचे खासगी फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. बंगाली महिला जीवन जगतात. खोटं नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. या फोटोमध्ये महुआ मोईत्रा सिगार पकडलेल्या दिसत आहेत. या फोटोला उत्तर देताना त्यांनी फोटोमधून इतर लोकांना हटवण्यात आल्याचा दावा केला होता. जर फोटो दाखवायचाच असेल तर सर्व लोकांचा फोटो दाखवा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.