नवी दिल्ली - स्मार्टफोन आणि इंटरनेट हे सर्वांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत.तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. लोकांना फायदे झाले आहेत. मात्र सोबतच फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध मार्गांनी नागरिकांना फसवत आहेत. युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स लाँच करत असतात. हीच बाब लक्षात घेत अनेक वेळा सायबर गुन्हेगार मोफत इंटरनेटचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करतात.
सायबर गुन्हेगार आता टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने युजर्सना मेसेज पाठवत आहेत. ज्यामध्ये या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत इंटरनेट मिळेल, असं लोकांना सांगितलं जातं. तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पीआयबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. हे खोटं असल्याचं म्हटलं आहे. तसेच सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.
पीआयबीने ट्वीट करून म्हटले आहे की, मोफत इंटरनेट डेटाची ऑफर अतिशय आकर्षक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कधीकधी ते धोकादायक असते. अशा फेक मेसेजद्वारे फसवणूक टाळण्यासाठी विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अलीकडे असेच कोरोना लसीशी संबंधित बनावट मेसेज देखील पाहिले गेले आहेत. लसीचा डोस पूर्ण झाल्यावर सरकार मोफत रिचार्जची भेट देत असल्याचा मेसेजद्वारे दावा करण्यात आला आहे. अशा मेसेजेसवर कधीही विश्वास ठेवू नका.
खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न
कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.