मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीबाबत साशंकता असल्याने विविध वाहिन्यांचे नेमके दर किती आहेत व नेमक्या कोणत्या वाहिन्यांची निवड करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ट्रायने सुरू केलेली वेबसाइट ग्राहकांना उपयुक्त ठरत आहे.वाहिन्यांची निवड करून शुल्क तपासण्यासाठी https://channel.trai.gov.in या वेबसाइटवर ग्राहकांना आपली नोंदणी करावी लागेल. त्यानंतर राज्य व कोणत्या भाषेतील वाहिन्या पाहायच्या आहेत त्याची नोंद करावी लागेल. त्यानंतर बातम्या, संगीत, क्रीडा, लाइफस्टाईल, धार्मिक, माहिती वाहिन्या, चित्रपट, लहान मुलांच्या वाहिन्या अशा पर्यायांपैकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर किमतीनुसार ५ रुपयांखालील, १० रुपयांखालील व १९ रुपयांखालील अशा वाहिन्यांची निवड करता येते. त्याशिवाय, ब्रॉडकास्टर्स कंपनीप्रमाणे, भाषेप्रमाणे, एसडी-एचडीप्रमाणे निवड करता येते. यानंतर नेमक्या कोणत्या वाहिन्या पाहायच्या त्यावर क्लिक करता येते. त्यासमोर त्यांची किंमत दिलेली आहे. सर्व निवड करून झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या वाहिन्यांची संख्या व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत ही माहिती ‘सिलेक्शन’मध्ये पाहता येते. तेथे गेल्यानंतर एकूण वाहिन्या, नि:शुल्क वाहिन्या, सशुल्क वाहिन्यांची संख्या, त्यांची किंमत, १८ टक्के जीएसटीप्रमाणे होणारी किंमत या सर्वांची एकूण रक्कम दाखवली जाते. ही माहिती डाऊनलोड करण्याची व प्रिंट काढण्याची सुविधादेखील यामध्ये देण्यात आली आहे.https://channeltariff.trai.gov.in या वेबसाइटवर विविध वाहिन्यांच्या समूहाची किंमत व त्यामध्ये समावेश असलेल्या वाहिन्यांची नावे, विविध सशुल्क वाहिन्यांची कमाल किंमत, नि:शुल्क वाहिन्यांची किंमत, ट्रायने सुचवलेल्या समूह वाहिन्यांची यादी अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे.केबलची दरवाढयामधून मध्यममार्ग काढत काही केबल चालकांनी सरासरी १०० रुपये वाढ केली असून ग्राहकांनीदेखील त्याला मान्यता दिली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एका केबल चालकाने ग्राहकांशी संवाद साधत त्यांना १०० रुपये वाढ केलेले दर देण्यास भाग पाडले आहे. ग्राहकांनीदेखील कोणती वाहिनी पाहायची, किती दर द्यायचा याबाबत केबल चालकाला सातत्याने संपर्क साधावा लागणार असल्याने व नवीन वाहिनी पाहण्यासाठी ग्राहकाला नव्याने अर्ज द्यावा लागणार असल्याने कोणतीही क्लिष्टता नको म्हणून सरसकट १०० रुपये वाढ देण्यास होकार दिला आहे. ग्राहकांनीदेखील नियमावलीत अडकण्यापेक्षा सरसकट १०० रुपये वाढ देण्यास सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे ट्रायच्या नियमावलीमुळे केबलचे दर कमी होण्याऐवजी वाढले आले आहेत.
चुटकीसरशी निवडा वाहिन्यांचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 5:27 AM