लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/शिमला ( Marathi News ): ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्ष जवळ येत असताना लाखो पर्यटकांनी आपल्या आवडत्या पर्यटनस्थळांवर गर्दी केल्याचे दिसून आले. देशात हिमाचल प्रदेश, गोवा, पाँडिचेरी, केरळ आदी ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळाल्याचे दिसून आले. पुराच्या तडाख्याने वाताहत झालेल्या हिमाचल प्रदेशातही सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलल्यामुळे राज्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डीजीपी संजय कुंडू म्हणाले की, लाखो पर्यटकांनी राज्याच्या विविध भागांना भेटी दिल्या आहेत. रोहतांग येथील अटल बोगद्याची काही छायाचित्रेही त्यांनी शेअर केली. जनतेने ख्रिसमसची संध्याकाळ शांततेत आणि सुरक्षितपणे साजरी करावी, यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून दक्षता ठेवण्यात आली.
अटल बोगद्याला मोठी पसंती
अटल बोगदा पाहण्यासाठी तोबा गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अटल बोगद्यात सुमारे ६५,००० पर्यटकांची नोंद करण्यात आली असून, १२,००० हून अधिक वाहने त्यांना घेऊन जात आहेत. आपत्तीनंतर हिमाचल प्रदेश पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा उभा राहिला आहे.