पटना - बिहारची राजधानी पटना येथील एका सिनेमागृहाच्या मालकाने सैन्यातील जवानांसाठी आजीवन मोफत सिनेमाला प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या दिवसापासून हा नवीन नियम रीजेंट फन सिनेमा या सिनेमागृहात लागू करण्यात आला आहे. नवीन वर्षापासून देशातील कुठलाही सैन्य दलातील जवान सिनेमागृहात मोफत सिनेमा पाहू शकणार आहे. रीजेंट सिनेमाचे मालक सुमन सिन्हा यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
देशातील जवानांच्या सन्मानार्थ आम्ही हा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी सांगितले. त्यानुसार, तिन्हा सैन्य दलातील जवान आणि निवृत्त सैनिकही मोफत तिकिटाचे बुकींग करु शकणार आहे. त्यासाठी, जवानांना केवळ आपले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. विशेष म्हणजे जवानांना लाईफटाईम या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. चित्रपटगृहाच्या नियमांतच जवानांसाठी मोफत चित्रपटगृह उपलब्ध करुन देण्याची अट ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुकींग काऊंटवरऐवजी ऑनलाईन बुकींगद्वारेही जवानांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. जवानांनी तिकीटाच्या खरेदीसाठी रांगेत उभे राहता कामा नये, म्हणून बुक माय शो या अॅपवरुनही त्यांना सिनेमाच्या तिकीटाचे बुकींग करता येईल, असेही सिन्हा यांनी सांगितले.
पटना येथील गांधी मैदानस्थित रीजेंट फन सिनेमा येथे ही सुविधा देण्यात येत आहे, त्यामुळे दानापूर आणि बिहटा येथील सैन्य दलाच्या आणि एअरफोर्सच्या जवानांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. दरम्यान, ऑनलाईन बुकींगमध्ये ओळखपत्र अपलोड केल्यानंतर एका ओळखपत्राद्वारे एक तिकीट मोफत बुकींग केले जाणार आहे.